छत्रपती संभाजीनगर : शहरातील जळगाव रोड परिसरात दुसऱ्या दिवशीही महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईने जोर धरला. पावसातही सुरू ठेवलेल्या या कारवाईत एकूण ४४५ अतिक्रमणावर मनपाने हातोडा मारत ही बांधकामे जमीनदोस्त केली. त्यामध्ये हॉटेल्स, लाँज, दुकाने, शेड्स, गाळे, वर्कशॉप्स, झोपड्या व रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत संरचना समाविष्ट होत्या.
ही मोहीम विशेष पोलिस बंदोबस्तात पार पडली. ३५० पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी, १५ वाजतगाड्या, १० जेसीबी, ५ ट्रॅक्टर, २ अग्निशमन बंब, आणि १५ मनपाचे पथक या कारवाईसाठी सज्ज होते. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेली ही मोहीम दिवसभर सुरु होती.
दरम्यान, या मोहिमेला आंबेडकरनगर परिसरात नागरिकांचा तीव्र विरोध झाला. महिलांनी घोषणा देत निषेध केला. काही नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या काही मागण्या मान्य करून तडजोड करून कारवाई करण्यात आली. मनपाच्या म्हणण्यानुसार, बाधित नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या भागात पूर्वीच नोटीस देऊन माहितीपत्रके वाटण्यात आले होते. मात्र काही व्यापाऱ्यांनी ती दखल न घेतल्याने त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली. यावेळी मनपा प्रशासनाने ध्वनीक्षेपकांद्वारे सूचना देत शासकीय मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय स्पष्ट केला.
कारवाई दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा उपयोग करावा लागला. सार्वजनिक शांतता राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
या मोहिमेमुळे अनेक व्यावसायिक व नागरिक प्रभावित झाले असले, तरी महापालिकेने स्पष्ट केले की रस्त्यांचा विस्तार, वाहतूक सुरळीत करणे, आणि अनधिकृत बांधकाम रोखणे यासाठी ही कारवाई अपरिहार्य होती.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*