खून झाल्याची खोटी माहिती डायल क्रमांक ११२ वर दिल्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलिसांची शुक्रवारी चांगलीच धावपळ उडाली. सर्वत्र शोध घेतल्यानंतर ही माहिती खोटी निघाल्याने पोलिसांनी एका तरुणावर कारवाई केली आहे.
शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजता कचरू सखाराम शहाणे (रा. बजाज नगर) याने डायल ११२ वर फोन करून वाळूजमध्ये खून झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल कल्याण खामकर आणि महेंद्र साळुंके यांनी सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांना ही माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र माहिती देणाऱ्याशी संपर्क साधताना त्याचा फोन बंद होता.
वाळूज परिसरात खून तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने पोलिसांनी तातडीने संपूर्ण औद्योगिक परिसर पिंजून काढला. मात्र, खून झालेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही. तसेच कचरू शहाणेचा मोबाइल बंद असल्यामुळे पोलिसांनी दुपारपर्यंत शोधमोहीम सुरूच ठेवली होती. निर्जनस्थळांवर शोध घेतल्यावर काही वेळाने कचरूचा मोबाइल सुरू झाल्यावर त्याच्याशी संपर्क साधण्यात आला.
कचरूने सांगितले की, काही लोक त्याला विनाकारण त्रास देत होते आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्याने खून झाल्याची खोटी माहिती दिली होती. पोलिसांनी दिशाभूल केल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली आहे.
पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिस करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*