छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडून थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी राबवण्यात आलेल्या ‘शास्ती से आजादी’ या विशेष मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम १५ जुलैपासून सुरू झाली असून १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल १३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे बुधवारी (१३ ऑगस्ट) एकाच दिवशी ८ कोटी ६५ लाख रुपयांचा मालमत्ता कर आणि १७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली. ही आजवरची सर्वाधिक दैनंदिन वसुली ठरली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२४ रोजी ७ कोटी २० लाख रुपयांची वसुली झाली होती. या योजनेत थकीत दंडावर तब्बल ९५ टक्के सवलत दिली जात आहे, त्यामुळे अनेक वर्षांपासून थकीत असलेले करदाते आता पुढे येऊन कर भरत आहेत.
शहरातील सुमारे ३.२५ लाख मालमत्ताधारकांकडे ८१९ कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी २२९ कोटी रुपये फक्त दंडाचे आहेत. या मोहिमेत आतापर्यंत १० कोटी रुपयांहून अधिक दंड माफ करण्यात आला आहे. नागरिकांना कर भरण्यास सोयीस्कर होण्यासाठी महापालिकेची कार्यालये रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, “या योजनेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. तिजोरीत मोठ्या प्रमाणात निधी जमा होत असून यामुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल.”
महापालिकेच्या या उपक्रमामुळे जुन्या थकबाकीदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी १५ ऑगस्टपूर्वी कर भरणे आवश्यक आहे. ‘शास्ती से आजादी’ मोहिमेमुळे मनपाच्या महसुलात लक्षणीय वाढ होत असून शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*