छत्रपती संभाजीनगर : शहराच्या ११ वॉर्डांचा पाणीपुरवठा हर्सूल तलावावर अवलंबून आहे. मात्र यंदाचा पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आले तरी तलावात पाण्याची अपेक्षित आवक झालेली नाही. परिणामी, तलावातील जलसाठा सध्या १८ ते १९ फुटांवर आहे. गेल्या आठ दिवसांत केवळ १ फुटाने पाणीपातळीत वाढ झाली असून हा आकडा नागरिकांसाठी चिंताजनक ठरत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरात दमदार पाऊस झालेला नाही. गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या काही प्रमाणातील पावसामुळे हर्सूल तलावातील पाणीपातळीत दोन फुटांची वाढ झाली होती. मात्र, शंभर टक्के भरण्यासाठी चार महिने लागले होते. यंदा देखील परिस्थिती जवळपास तशीच असून तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे.

हर्सूल तलावाची पाणी साठवण क्षमता २८ फूट आहे. सध्या तलावातील पाणीपातळी १९ फुटांवर असून ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी ९ फूट पाणी आवश्यक आहे. दरम्यान, या तलावावर अवलंबून असलेल्या ११ वॉर्डांचा पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या दररोज ८ एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे. यापूर्वी फक्त ६ एमएलडी पाणी उचलले जात होते, परंतु नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारल्यानंतर उपशाची क्षमता वाढविण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी तलावातील पाणीपातळी किमान २७ ते २८ फुटांवर पोहोचणे गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांसह प्रशासनही चिंतेत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला तरच हर्सूल तलाव भरून येण्याची शक्यता आहे. अन्यथा आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,196 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क