नवी दिल्ली : देशात उद्यापासून जीएसटी २.० प्रणाली लागू होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. त्यांनी कर व्यवस्थेतील नव्या सुधारणा, जीएसटी बचत महोत्सव आणि भारतीयांनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे महत्त्व यावर भाष्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नकळत अनेक परदेशी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. आपल्या खिशातील कंगवा भारतीय आहे की परदेशी, हेही अनेकदा आपल्याला ठाऊक नसते. आता आपण या परावलंबनातून मुक्त व्हावे लागेल. आपल्या घरातील प्रत्येक वस्तू स्वदेशीचे प्रतीक बनली पाहिजे. आपल्या देशातील कारागीर व उद्योजकांच्या मेहनतीला न्याय मिळावा म्हणून भारतीयांनी स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी.”
मोदींनी पुढे सांगितले की, “आपल्याला मेड इन इंडिया वस्तू खरेदी करायच्या आहेत. आम्ही स्वदेशी उत्पादन खरेदी करतो, हे गर्वाने सांगायला हवे. प्रत्येक भारतीयाने हा संकल्प केला तर देशाचा विकास अधिक वेगाने होईल.”
कर सुधारणा आणि जीएसटीबाबत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, उद्यापासून देशात ‘जीएसटी बचत महोत्सव’ सुरू होत आहे. यामुळे ग्राहकांची बचत वाढेल तसेच त्यांना विविध वस्तू अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील. “या सणासुदीच्या काळात देशभरातील कुटुंबांना या महोत्सवाचा लाभ होईल. समाजातील सर्व घटकांसाठी हा महोत्सव गोडवा आणि आनंद घेऊन येईल,” असे मोदी म्हणाले.
२०१७ मध्ये जीएसटी सुरू करण्यामागील उद्देश देशातील गुंतागुंतीच्या कर व्यवस्थेला सुलभ करणे हा होता, असे त्यांनी आठवण करून दिले. “अनेक दशकांपासून लोक आणि उद्योगपती विविध करांच्या जाळ्यात अडकले होते. जीएसटीमुळे कर प्रणाली एकसंध झाली. आता जीएसटी २.०मुळे त्यात आणखी सुसूत्रता येईल,” असे ते म्हणाले.
नवीन प्रणालीमध्ये आता फक्त दोनच कर स्लॅब असतील – ५% आणि १८%. अन्नधान्य, औषधे, टूथपेस्ट, साबण, ब्रश, आरोग्य व जीवन विमा यांसारख्या बहुतेक दैनंदिन वस्तूंवर करमुक्ती किंवा फक्त ५% कर असेल. पूर्वी १२% कर लावल्या जाणाऱ्या ९९% वस्तूंवर आता केवळ ५% कर आकारला जाणार आहे.
मोदींनी शेवटी देशवासीयांना आवाहन केले की, “स्वदेशी खरेदीला प्रोत्साहन द्या, बचत महोत्सवाचा लाभ घ्या आणि जीएसटी २.० चा भाग बनून भारताच्या वेगवान विकासयात्रेत सहभागी व्हा.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
