छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले असताना, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमुक्ती, पंजाबच्या धर्तीवर प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत आणि पीक विम्याचे नवे निकष रद्द करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे रविवार, ४ ऑक्टोबर रोजी गंगापूर तालुक्यातील शिवराई येथे सकाळी १० वाजता आणि संभाजीनगर तालुक्यातील गाडी जळगाव येथे दुपारी २ वाजता ग्रामसभा घेणार आहेत. या बैठकीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील, अशोक शिंदे, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे व दिनेश मुथा यांनी केले आहे.
अंबादास दानवे म्हणाले, “मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे पीक, घर आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सरकार निष्क्रिय आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील असून त्यांच्या प्रश्नांपासून पळ काढत आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “फक्त मोर्चाच नव्हे, तर ८ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने आणि धरणे धरली जातील. तसेच ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान गावोगावी ग्रामसभा घेऊन जनजागृती केली जाईल.”
या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा आवाज ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*