छत्रपती संभाजीनगर : लग्नाळू युवकासोबत कोर्ट मॅरेज करून नवरीने रस्त्यातूनच पळून जाण्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात तीन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली असून, या फसवणुकीत तब्बल ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज गेला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी माहिती दिली.

फिर्यादी हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शेतकरी असून, आपल्या मुलगा महेश (नाव बदलले) यासाठी वधू शोधत होते. तेव्हा शेतात कामासाठी येणाऱ्या एका महिलेने ओळखीतील मुलगी असल्याचे सांगत तिचा फोटो व बायोडेटा दाखवला. त्यानंतर मुलगी पसंत पडल्याने संपर्क साधण्यात आला. आरोपींनी स्वतःला मुलीची मावशी म्हणून सादर केले आणि २३ सप्टेंबर रोजी फिर्यादी कुटुंब सिडको एन-६ भागात त्यांच्या घरी गेले.

तिथे आरोपी ज्योती राजू गायकवाड (बोगस नाव ज्योती मिसाळ, रा. हर्षनगर), माया मधुकर शिंदे आणि सविता मधुकर शिंदे (रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) या महिलांनी मुलगी दाखवून तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई आजारी असल्याची खोटी कहाणी सांगितली. त्यानंतर मुलीच्या उपचारांसाठी आणि दागिन्यांसाठी १.८० लाख रुपये रोख मागितले. कोर्ट मॅरेजसाठी वकिलाला ५ हजार रुपये दिल्यानंतर फिर्यादींनी एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा व्यवहार केला.

२४ सप्टेंबर रोजी सर्वजण जिल्हा न्यायालयासमोर कोर्ट मॅरेजसाठी जमले. तलवार नावाच्या वकिलाने कागदपत्रे घेऊन फी म्हणून १२ हजार रुपये घेतले. विवाहानंतर सर्व मंडळी मुलगी घेऊन गावाकडे निघाली. मात्र, शहराच्या बाहेर पडताच हॉटेलवर चहासाठी थांबले असता अचानक एक पांढरी स्कॉर्पिओ आली आणि नवरी माया शिंदे त्यात बसून पसार झाली.

घटना घडल्यानंतर बदनामीच्या भीतीने फिर्यादी कुटुंबाने काही दिवस तक्रार दिली नाही. मात्र, नंतर कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे अशाच प्रकारे फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागल्याचे समोर आले. शहानिशा केल्यानंतर त्याच महिलांनी स्वतःला फसवले असल्याचे स्पष्ट झाल्यावर फिर्यादीने छत्रपती संभाजीनगर सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,975 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क