छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथून तीन वर्षांच्या चिमुकल्याला स्पीच थेरपीसाठी समर्थनगर येथे आणलेल्या आईची ६ लाखांचे हेरिंग एड मशीन, मोबाईल आणि रोकड असलेली बॅग शनिवारी (दि. १८) रिक्षात विसरली होती. या बॅगेत चिमुकल्याचे ऐकण्याचे महत्त्वाचे मशीन असल्याने आईची अवस्था अत्यंत व्याकुळ झाली होती. अखेर तिने थेट पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवून मदत मागितली आणि आयुक्तांनी क्षणाचाही विलंब न लावता गुन्हे शाखेला आदेश दिले. परिणामी अवघ्या तासाभरात बॅग परत मिळाली.
फिर्यादी प्रिया विक्रांत वानखेडे (२४, रा. बजाजनगर, मूळ अकोला) या आपल्या तीन वर्षांच्या मुलाला स्पीच थेरपीसाठी वाळूज येथून समर्थनगर येथे घेऊन आल्या होत्या. घाईगडबडीत त्यांनी बॅग रिक्षात विसरली. त्यात मुलाचे ६ लाखांचे हेरिंग एड मशीन, २१ हजार रुपयांचा मोबाईल आणि एक हजाराची रोकड होती. बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आयुक्त पवार यांना संदेश पाठवून मदत मागितली.
पोलिस आयुक्तांनी तत्काळ गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांना आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रविकांत गच्चे, अंमलदार सिद्धार्थ थोरात, विजय घुगे आणि यशवंत गोबाडे यांनी बॅग शोधून काढली. बॅग हातात घेताच प्रिया यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. “आता माझ्या मुलाला दिवाळीत फटाक्यांचे आवाज ऐकू येतील, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पोलिसांच्या तत्परतेबद्दल उमेश महापुरे, सुमित वानखेडे, विलास गवळी, पंडित शिंदे यांनीही आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त नंदलाल कुचे यांचे अभिनंदन केले. या घटनेमुळे पोलिसांनी समाजात मानवी संवेदनशीलतेचा आणि सेवाभावाचा सुंदर आदर्श घालून दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*