छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या “जॉईन आरएसएस” सदस्यता मोहिमेला आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी विरोध दर्शवल्याने वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील काही महाविद्यालयांसमोर आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी अभियान सुरू केले होते. या मोहिमेला विजय वाहूळ आणि राहुल मकासरे या आंबेडकरी तरुणांनी आक्षेप घेतला होता.
त्यांनी म्हटले की, आरएसएस ही धार्मिक संघटना असून तिची सदस्यता नोंदणी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात घेणे योग्य नाही. शिक्षणसंस्था या सर्वधर्मसमभावाच्या तत्वावर चालवल्या जातात, त्यामुळे अशा धार्मिक स्वरूपाच्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया महाविद्यालयाच्या बाहेर होणे आवश्यक आहे, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे दोघांनी आरएसएसची सदस्य नोंदणी प्रक्रिया थांबवली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी विजय वाहूळ आणि राहुल मकासरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईनंतर आंबेडकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या गुन्ह्यांची नोंद रद्द करण्यात यावी तसेच आरएसएसवर बंदी घालावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रल्हाद भवन कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून पोलिस प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.
पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. तर दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने हा मोर्चा शांततेत पार पाडला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, या आंदोलनामुळे शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*