छत्रपती संभाजीनगर : शहरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांप्रमाणेच सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे सुद्धा सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. दिवाळी सुट्यांमध्ये उद्यानात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेट देत प्राणिसंग्रहालयातील नवीन पाहुण्यांचा आनंद लुटला. मागील २० ते ३० ऑक्टोबर या नऊ दिवसांच्या कालावधीत तब्बल ३९ हजार ७९५ पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयात भेट दिली असून, या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत १६ लाख ८० हजार ७६० रुपयांचे उत्पन्न झाले आहे.
अलीकडेच प्राणिसंग्रहालयात कर्नाटकातील शिवमोग्गा येथून सिंह, अस्वल आणि कोल्हा या तीन नव्या प्राण्यांचे आगमन झाले आहे. तब्बल २० ते २५ वर्षांनंतर ‘जंगलाचा राजा’ सिंह पुन्हा एकदा संभाजीनगरातील प्राणिसंग्रहालयात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये सिंहाचे आकर्षण प्रचंड असून त्याच्या गर्जनेने बच्चे कंपनी अक्षरशः मंत्रमुग्ध होत असल्याचे चित्र दिसते.
दिवाळी सुट्यांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध शाळांच्या सहली सिद्धार्थ उद्यानात येत आहेत. प्राणिसंग्रहालयासोबतच उद्यानातील झुली, खेळणी आणि मनोरंजनाची साधने यामुळे पर्यटकांच्या आनंदात भर पडत आहे. सिंह, अस्वल, कोल्हा, वाघ, हरिण, काळवीट, सांबर, निलगाय, मोर यांसह अनेक प्राणी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे.
सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय मंगळवारी बंद असते, तर उर्वरित सर्व दिवस ते नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले असते. प्राप्त आकडेवारीनुसार, नऊ दिवसांत आलेल्या पर्यटकांपैकी २९ हजार २६६ जण प्रौढ आणि १० हजार ५२९ मुले होती. या मोठ्या प्रतिसादामुळे महापालिकेला मिळालेले उत्पन्न हे गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक मानले जात आहे.
नवीन प्राण्यांचे आगमन, सुट्यांचा काळ आणि वाढती शैक्षणिक सहलांची संख्या यामुळे सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पुन्हा एकदा शहरातील पर्यटनाचा ‘हॉटस्पॉट’ बनले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*