छत्रपती संभाजीनगर : तब्बल १८ दिवसांच्या दिवाळी सुटीनंतर आज (दि. ३ नोव्हेंबर) पासून शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू होत आहेत. दीर्घ विश्रांती, मामाच्या गावी साजरी केलेली दिवाळी, फराळाचा आस्वाद आणि धमाल-मस्ती संपवून आता पुन्हा एकदा बच्चे कंपनी शाळेच्या गेटकडे वळली आहे. सकाळी घंटा वाजताच शाळांच्या परिसरात पुन्हा एकदा गजबज, किलबिलाट आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चकल्या, लाडू, करंजी, शंकरपाळे यांचा आस्वाद घेत, नवीन कपडे परिधान करून, फटाके फोडत आणि कुटुंबासह मौजमस्ती करत विद्यार्थ्यांनी सुट्ट्या मनसोक्त साजऱ्या केल्या. आता मात्र पुन्हा वही, पुस्तके, आणि अभ्यासाच्या जगात परतण्याची वेळ आली आहे. “कधी एकदा शाळा सुरू होते” अशी आतुरता असलेल्या विद्यार्थ्यांनी आज सकाळपासूनच उत्साहाने शाळेचा रस्ता धरला.
शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी थोडी कठीण गेली असली तरी त्यांनी आपल्या बाळांसोबत सण साजरा केला. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, आर्थिक संकट या सगळ्या अडचणींमध्येही लेकी-बाळींचा आनंद पाहून बळीराजा सुखावला.
शिक्षण विभागाकडून द्वितीय सत्रातील उपक्रमांची आखणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ४ हजार ४५९ शाळांमध्ये आठ लाखांहून अधिक विद्यार्थी आजपासून पुन्हा शिक्षणात रमणार आहेत. पहिल्या सत्रात पायाभूत आणि संकलित मूल्यमापन चाचण्या झाल्या असून आता विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सजावट, फुलांचा वर्षाव आणि “वेलकम बॅक” उपक्रमांचे आयोजन केले आहे. दीर्घ सुट्यांनंतर पुन्हा मित्रमैत्रिणींच्या गप्पा, वर्गातील धडे आणि शाळेचा नवा उत्साह यामुळे बच्चे कंपनीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*