छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत. ‘दगाबाज रे’ या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दानवे म्हणाले की, “राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. दिवाळीपूर्वी या पॅकेजचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले. मात्र सरकारने आजतागायत शेतकऱ्यांना एक रुपयाही दिलेला नाही. अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या, घरे वाहून गेली, पण त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही,” अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांचा दौरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुरू होणार असून ते मराठवाड्यातील तब्बल ३४ तालुक्यांतील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणार आहेत. याआधी २५ सप्टेंबर रोजीही ठाकरे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला होता. आता पुन्हा एकदा ते शेतकऱ्यांच्या अडचणी थेट ऐकून घेऊन सरकारकडे त्यांच्या समस्या मांडणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*