छत्रपती संभाजीनगर : सेवा हमी कायदा 2015 ची अंमलबजावणी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना विविध सरकारी सेवांची माहिती आता थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार असून, यासाठी 9967200925 हा अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नागरिकांनी या सुविधेचा व्यापक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
नागरिकांना सेवा सहज, वेगवान आणि त्रासमुक्त पद्धतीने मिळाव्यात या उद्देशाने विकसित केलेला हा चॅटबॉट पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या माध्यमातून महा ई-सेवा केंद्रांची ठिकाणे, वेळा, सेवांची सविस्तर माहिती, थेट ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक, महसूल सेवांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, तसेच कोणत्या सेवेसाठी कुठे संपर्क साधावा लागेल याची अचूक माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांना घरपोच सेवा हवी असल्यास त्यासाठीही व्हॉट्सॲपवरून विनंती करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच कार्यालयात प्रत्यक्ष येणे शक्य नसलेल्या नागरिकांना हा उपक्रम मोठी सोय ठरणार आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक सुलभ करण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. सेवा हमी कायद्यातील पारदर्शकता वाढवून नागरिकांचा वेळ वाचवणे, तक्रार निवारण जलद करणे आणि सरकारी सेवांवर लोकांचा विश्वास अधिक दृढ करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, भविष्यात अशा आणखी सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*