छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना हवामानातील सतत होणारे बदल, बाजारपेठेतील चढउतार आणि माहितीच्या कमतरतेमुळे आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून कृषी विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘महाविस्तार’ हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अॅप विकसित केले आहे. मातीपासून मार्केटपर्यंत शेतीशी संबंधित सर्व मार्गदर्शन एका ठिकाणी मिळावे, यासाठी हे अॅप ‘वन स्टॉप सोल्यूशन’ म्हणून काम करत आहे.
या अॅपमध्ये मराठी भाषेतील चॅटबॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी मजकूर किंवा आवाजाद्वारे प्रश्न विचारू शकतात आणि त्यांची उत्तरे काही सेकंदांत मिळतात. त्यामुळे माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात जाण्याचा त्रास कमी होणार असून शेतकऱ्यांना निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे, असे विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी सांगितले.
अॅपचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ अनिवार्य आहे. या आयडीत शेतीविषयक सर्व आवश्यक माहिती, जसे की शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते, सातबारा उतारा, शेतीचे क्षेत्रफळ, पिकांची माहिती, घेतलेली कर्जे आणि विमा योजना नोंदविलेल्या आहेत.
सध्या छत्रपती संभाजीनगर विभागातील हजारो शेतकरी या अॅपचा लाभ घेत आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११,४२३, जालना जिल्ह्यातील १५,११३ आणि बीड जिल्ह्यातील ५,९८९ शेतकऱ्यांनी महाविस्तार अॅप इन्स्टॉल करून वापर सुरू केला आहे. हे आकडे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यास उत्सुक असल्याचे दर्शवतात.
अॅपमध्ये शेतकऱ्यांना हवामान अंदाज, लागवडीचे तंत्र, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, बाजारभाव, कीड व रोग नियंत्रण, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था तसेच डीबीटी योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध केली आहे. हवामान बदलासह नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*