छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत अभूतपूर्व यश मिळवत जागतिक पातळीवर विक्रम नोंदविला आहे. महावितरणने केवळ एका महिन्यात तब्बल ४५,९११ सौर कृषिपंपांची स्थापना करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मान मिळवला आहे. या विक्रमाची अधिकृत नोंद झाल्यानंतर राज्यभरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या महत्त्वपूर्ण उपलब्धीनिमित्त गिनीज बुककडून महाराष्ट्राला विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्याचा विशेष सोहळा शुक्रवार (ता. ५ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजता शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरिक सिटी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, पालकमंत्री संजय शिरसाट यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फक्त १० टक्के रक्कम भरून कृषिपंप आणि सौर पॅनल्सचा संपूर्ण संच उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात या योजनेद्वारे साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यामुळे वीज जोडणीची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची दीर्घकालीन समस्या सुटणार आहे.
सौर ऊर्जेवर आधारित कृषिपंप असल्याने शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याचे निर्बंध किंवा वेळेची मर्यादा न राहता दिवसा कधीही सिंचन करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. शिवाय सौर पॅनल्समधून २५ वर्षांपर्यंत वीज निर्मिती होत असल्याने वीजबिलाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
या योजनेमुळे महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जा, शेती विकास आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून हा विक्रम देशासाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*