छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देणाऱ्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दररोज टवाळखोरांकडून त्रास वाढत चालल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यानात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांशी वाद, अरेरावी तसेच गैरवर्तनाच्या घटना सतत घडत असल्याने आता उद्यान सायंकाळी ६ वाजता बंद करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.

छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यान हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असून येथे सिंह, वाघ, माकडे, हरणे, नीलगाय, कोल्हे, सांबर यांसारख्या विविध प्रजातींचे प्राणी पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. तसेच सर्पालय आणि मच्छालय देखील पर्यटकांना आकर्षित करते. दुपारी ३ नंतर येथील गर्दी वाढते, मात्र नेमक्या या वेळेत काही पर्यटक सुरक्षा नियमांचं उल्लंघन करतात.

विशेषतः १५ ते २५ वयोगटातील युवक-युवतींनी नियमांकडे दुर्लक्ष करत सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालणे, त्यांच्यावर ओरडणे, अंगावर धावून जाणे तसेच अश्लील हावभाव करण्याचे प्रकार वाढल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. या संदर्भात उद्यान प्रशासनाने पोलिसात अनेकदा तक्रारही केली असून, पोलीस आणि दामिनी पथक वेळोवेळी गस्त घालत असले तरी समस्या कायम होती.

परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी वेळ कमी करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे पाठवला. त्यावर निर्णय घेत उद्यानाची वेळ एक तासाने कमी करण्यात आली असून आता ते संध्याकाळी ६ वाजता बंद राहील. तसेच त्या वेळेनंतर तिकीट विक्रीही थांबवण्यात आली आहे.

हा निर्णय पर्यटक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,246 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क