छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, आता लाइनमनना थेट नागरिकांच्या दारावर जाऊन वसुलीची माहिती घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक भागात कार्यरत असलेले लाइनमन आता नागरिकांकडून नाव, पत्ता, नळ कनेक्शन क्रमांक, मालमत्ता क्रमांक, तसेच मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरली आहे का, याची माहिती घरपोच जाऊन संकलित करत आहेत. मात्र, प्रशासनाने वसाहतीनिहाय अद्ययावत यादी न दिल्याने अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण होत असल्याची टीका सुरू आहे.

महापालिकेच्या माहितीप्रमाणे शहरात तब्बल ३ ते ३.२५ लाख मालमत्ता असून, यापैकी फक्त लाख-सव्वा लाख नागरिक नियमित मालमत्ता कर भरतात. परंतु पाणीपट्टी भरणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असून अनेकांकडे पाणीपट्टी थकीत आहे. एवढेच नव्हे, तर शहरात विनापरवानगी घेतलेल्या अवैध नळजोडण्यांचे प्रमाण मोठे असून, त्यात लाइनमनचाही सहभाग असल्याचे आरोप होत आहेत.

या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी लाइनमनकडे पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी सोपवली. त्यांना यासंदर्भात प्रशिक्षणही देण्यात आले असून, डिसेंबरपासून पाणीपुरवठा विभागाने ही मोहीम सुरू केली आहे. शहरात सध्या दहा झोनमध्ये सुमारे ३५० लाइनमन कार्यरत आहेत. दिवसभरात प्रत्येकी ३०० मालमत्तांची माहिती घेण्याचे लक्ष्य त्यांना दिले आहे.

दरम्यान, आतापर्यंत १,१९,३८३ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरून १५६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. तर पाणीपट्टीपोटी केवळ १४ कोटी रुपये जमा झाले आहेत. अनेक मालमत्ताधारक पुढील मार्चमध्ये पाणीपट्टी भरण्याचे कारण देत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

756 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क