छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये साडेचार हजारांहून अधिक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त महिलांची पोलिस भरतीत निवड व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागाकडून विशेष पूर्वप्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी १८ ते ३३ वयोगटातील मुली व महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महापालिका हद्दीतील रहिवासी आणि किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या उपक्रमाचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात अशा स्वरूपाचा उपक्रम राबविणारी छत्रपती संभाजीनगर ही पहिलीच महापालिका असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलांना सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्रशिक्षणादरम्यान पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत या सर्व टप्प्यांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करताना रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना केवळ नाममात्र १० टक्के शुल्क म्हणजेच सुमारे २,५०० रुपये भरून नियोजित ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर असून इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या खासगी पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रांकडून २५ ते ३० हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याने अनेक गरीब कुटुंबातील मुली भरती प्रक्रियेपासून वंचित राहत असल्याचे लक्षात आले. त्यामुळेच हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शहरातील पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलींची संख्या मोठी असून राज्यातील पोलिस भरतीत सर्वाधिक महिला उमेदवार छत्रपती संभाजीनगर शहरातून निवडल्या जाव्यात, हा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*