छत्रपती संभाजीनगर : शहरातील दुचाकीधारकांच्या खिशाला आता अधिकचा फटका बसणार असून, दुचाकी सर्व्हिसिंगच्या दरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक संघटनेने घेतला आहे. मराठवाडा विभागीय मेळाव्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला असून, येत्या २६ जानेवारीपासून दुचाकी सर्व्हिसिंगसाठी आकारले जाणारे शुल्क ३०० रुपयांवरून थेट ४०० रुपये करण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष सय्यद चाँद यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
तापडिया नाट्यमंदिरात पार पडलेल्या या मेळाव्यात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे २२०० दुचाकी मेकॅनिक सहभागी झाले होते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर मेकॅनिकांनी स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज असल्याचे मत नागपूरचे संघटनेचे अध्यक्ष निशिकांत पोहनकर यांनी व्यक्त केले. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढणार असल्याने त्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात तालुक्याच्या ठिकाणी विशेष ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यातून ग्रामीण भागातील मेकॅनिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. यासोबतच मेकॅनिकांसाठी सामूहिक विमा (ग्रुप इन्शुरन्स) काढण्याचाही निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे अपघात किंवा अनपेक्षित परिस्थितीत आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
संघटनेने स्पष्ट केले की ४०० रुपयांच्या सर्व्हिसिंगमध्ये ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये स्पार्क प्लगची स्वच्छता, एअर फिल्टरची तपासणी, कार्बरिटर सेटिंग, ड्राइव्ह चेनची स्वच्छता व अचूक सेटिंग, पुढील व मागील चाकांचे ग्रीसिंग, टॅपेट सेटिंग, गाडीचे इंधन सरासरी (अॅव्हरेज) तपासणी तसेच सर्व्हिसिंगनंतर संपूर्ण वॉशिंग यांचा समावेश आहे.
दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अपरिहार्य असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*