छत्रपती संभाजीनगर : नवी दिल्ली येथे २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताकदिन पथसंचलनासाठी (नॅशनल परेड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागातील स्वयंसेविका अक्षता अच्युत मुळे हिची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, मागील पाच वर्षांपासूनची प्रतिक्षा या निमित्ताने संपली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोमनाथ खाडे यांनी दिली.
अक्षता मुळे ही अंबाजोगाई येथील विद्यार्थिनी असून, विद्यापीठाच्या रासेयो विभागातून तिची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे. पश्चिम विभागीय स्तरावरील निवड चाचणी ३१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात विद्यापीठ, पाटन (गुजरात) येथे आयोजित करण्यात आली होती. या निवड प्रक्रियेसाठी विद्यापीठाच्या अंतर्गत चार जिल्ह्यांमधून आठ जणांचा संघ सहभागी झाला होता.
या निवड चाचणीमध्ये १५ दिवसांचे कठोर प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणानंतर महाराष्ट्र राज्यातून एकूण १२ स्वयंसेवकांची अंतिम निवड करण्यात आली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातून अक्षता अच्युत मुळे हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताकदिन पथसंचलनासाठी निवड करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते अक्षता मुळे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोमनाथ खाडे, प्राचार्य डॉ. एम. व्ही. कानेटकर यांनी तिचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच रासेयो विभागातील अनिल मालकर, श्याम बन्सवाल, सुनील पैठणे यांच्यासह सहकारी व विद्यार्थी वर्गाने अक्षता मुळे हिचे अभिनंदन केले.
अक्षता मुळे हिची ही निवड विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्याची आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाची पावती मानली जात असून, भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*