छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटी महामंडळाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक परिसर तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात १ जानेवारीपासून करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मोहिमेची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली असून, प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले जाईल, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, नीटनेटकी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून, प्रवासी सेवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत बसस्थानकातील फलाट, बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे तसेच कार्यालयीन कक्षांची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच अनावश्यक जाहिरात बॅनर हटविणे, साचलेला कचरा काढून टाकणे, झाडे-झुडपे व जाळी-जमटांचे निर्मूलन करून परिसर अधिक स्वच्छ व सुंदर केला जाणार आहे.

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे ठेवून कचऱ्याचे वर्गीकरण व योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.

या स्वच्छता मोहिमेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग घेतला जाणार आहे. नियमित स्वच्छतेसोबतच वर्षातून दोन वेळा सखोल स्वच्छता करण्यात येणार असून, जानेवारीपासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

492 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क