छत्रपती संभाजीनगर : भारतीय चित्रपटसंगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार असून, या घोषणेमुळे देशभरातील चित्रपट व संगीत क्षेत्रात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात, बुधवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस हा महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होणार आहे.
महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम आणि मानद अध्यक्ष दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी इलयाराजा यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. पद्मपाणि पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक लतिका पाडगांवकर होत्या, तर सदस्य म्हणून आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी काम पाहिले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी ७ हजारांहून अधिक गाणी आणि १५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि मराठी अशा विविध भाषांतील त्यांची संगीतरचना आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्त्य सिम्फनी यांचा सुरेख संगम ही त्यांची खास ओळख असून ‘इसैग्नानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलयाराजा यांच्या संगीत साधनेला हा पुरस्कार अर्पण करण्यात येणार आहे. देश-विदेशातील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*