छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियानांतर्गत आजवरची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई करत शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. कन्नड तालुक्यातील जैतपूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीच्या मदतीने सुरु असलेला कॉपीचा प्रकार उघडकीस आणत तब्बल १९ पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांविरोधात निलंबनासह कठोर कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. १० फेब्रुवारी) इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून तसेच उत्तरांच्या झेरॉक्स प्रती वापरून सर्रास गैरप्रकार करत असल्याची तक्रार प्रशासनाकडे दाखल झाली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत भरारी पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पर्यवेक्षकांच्या डोळ्यांदेखत विद्यार्थी खुलेआम कॉपी करत असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई राबवण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षकांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून खासगी संस्थांतील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्राची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी केंद्र संचालकांसह सर्व १९ कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीसीटीव्ही हा प्रशासनासाठी ‘तिसरा डोळा’ ठरल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपीमुक्त परीक्षा अभियान अधिक प्रभावी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कडक शिस्त पाळली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला असून भविष्यात कोणत्याही गैरप्रकारास माफी दिली जाणार नाही, असा ठाम संदेश देण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*