छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

या अभियानांतर्गत मंदिर परिसर, प्रमुख रस्ते, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच भाविकांच्या ये-जा मार्गांची सखोल साफसफाई करण्यात आली. ग्रामपंचायत व नगरपरिषद कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

“महाशिवरात्री हा धार्मिक उत्सव असला तरी स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भाविकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य पथके सज्ज ठेवण्यात आली असून, कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्ताची तयारी दर्शवली आहे.

या मोहिमेत तहसीलदार संतोष गुट्टे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, खुलताबादचे मुख्याधिकारी समीर शेख, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महास्वच्छता अभियानामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे चित्र दिसून येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

413 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क