छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त यंदा सुमारे दोन लाख भाविक येण्याचा अंदाज मंदिर संस्थान समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे. देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी मंदिर न्यास व प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून चोवीस तासांहून अधिक काळ अखंड दर्शन व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

शनिवारी दिवसभरात सुमारे साठ हजार भाविकांनी दर्शन घेतले. महाशिवरात्रीची सुरुवात रात्री बारा वाजता महाअभिषेक व महाआरतीने झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कीर्तन, भजन, प्रवचने, शिवनामाचा गजर आणि घंटानादामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.

मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी विशेष समित्या स्थापन करून नियोजन आखले आहे. खुलताबाद पोलिस ठाण्याकडून वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी निरीक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. खासगी सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे.

भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत कक्ष, प्रसाद वितरण केंद्र, आपत्कालीन सेवा, आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. यंदा भाविकांना सुमारे तीन तासांत दर्शन मिळावे यासाठी विशेष रांग व्यवस्थापन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून वेरूळसाठी दर पंधरा मिनिटांनी विशेष बससेवा सुरू करण्यात आली असून मोठ्या संख्येने फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच वेरूळ परिसर वाहनमुक्त क्षेत्र घोषित करण्यात आल्याने भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शनाचा लाभ मिळत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

564 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क