छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य बाजारपेठा आणि गजबजलेल्या भागांमध्ये महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून ‘ई-टॉयलेट’ पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प सुरू होत असून, शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत एक सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी (ता. १७) आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणांपैकी गुलमंडी आणि उस्मानपुरा या दोन भागांची निवड पायलट प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक ‘ई-टॉयलेट’ उभारण्यात येणार असून, महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ सुविधा मिळणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या मते, या ई-टॉयलेटमध्ये स्वयंचलित स्वच्छता प्रणाली, पाणी आणि वीजेची योग्य व्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना शहरात फिरताना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या शहरात सार्वजनिक प्रसाधनगृहांची कमतरता भासत असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या प्रयोगाला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यावर पुढील विस्तार अवलंबून असणार आहे. पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास शहरातील इतर प्रमुख ठिकाणीही टप्प्याटप्प्याने ई-टॉयलेट उभारण्यात येणार आहेत.

सभापती अनिल मकरिये यांनी सांगितले की, “महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. ई-टॉयलेटमुळे स्वच्छतेचा दर्जा निश्चितच सुधारेल.” या बैठकीला जालिंदर शेंडगे, संजय कोंबडे, शंकर म्हात्रे, किशोर मानकापे आणि सागर नीलकंठ यांची उपस्थिती होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

861 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क