छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील बजाजनगर परिसरात एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून स्वतःच्या हातावर चाकूने तब्बल ३० वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, रात्रभर तो रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला आणि सकाळी शुद्धीवर आल्यानंतर शेजाऱ्यांकडे पाणी मागितल्याने हा प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून गेल्या दहा वर्षांपासून बजाजनगर परिसरातील एका सोसायटीत वास्तव्यास आहे. तो वाळूज औद्योगिक वसाहतीत कामगार म्हणून कार्यरत आहे. सध्या त्याची पत्नी दुसऱ्या प्रसूतीसाठी माहेरी गेली असल्याने तो घरी एकटाच राहत होता. १५ एप्रिलच्या रात्री त्याने मद्यप्राशन केल्यानंतर अचानक स्वतःवर धारदार शस्त्राने वार करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
या घटनेत त्याच्या हातावर गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तो घरातच बेशुद्ध अवस्थेत रात्रभर पडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर त्याने घराबाहेर येऊन शेजाऱ्यांकडे पाणी मागितले. त्याची अवस्था पाहून शेजाऱ्यांनी तात्काळ घरात धाव घेतली असता, घरात सर्वत्र रक्ताचे डाग आणि थारोळे दिसून आले.
नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून प्राथमिक उपचारांनंतर त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. घरगुती वाद किंवा मानसिक तणावामुळे त्याने हे पाऊल उचलले का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*