छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर परिसरातील बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातून अटक केली आहे. रामा ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय ३३) आणि चंद्रकांत अनंत माने (वय ३३, रा. चिंचवड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून चोरीतील ३६ हजार ६०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर भागातील रहिवासी लक्ष्मण मारुती कदम (वय ४४) हे १० जानेवारी रोजी कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सुमारे ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या ऐवजात १ लाख ७० हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने तसेच महागडी घड्याळे यांचा समावेश होता. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्हे शाखेचे पथक या घरफोडीचा कसून तपास करत होते. १६ एप्रिल रोजी आरोपी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कळंब तालुक्यातील गौर वाघोली येथे सापळा रचला. योग्य क्षण साधत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान आरोपींकडून चोरीतील काही रक्कम हस्तगत करण्यात आली असून, उर्वरित सोन्याचे दागिने आणि मुद्देमालाचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*