छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर महापालिकेची कारवाई अधिक तीव्र झाली आहे. बुधवारी पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नारेगाव येथील त्यांच्या घरावर मोठी कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने बांधकामाचा मोठा भाग जमीनदोस्त केला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

या कारवाईची माहिती मंगळवारी रात्रीच समोर आल्यानंतर माजी खासदार Imtiaz Jaleel यांच्यासह शहरातील सर्व ३५ नगरसेवक नारेगाव परिसरात दाखल झाले होते. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेच्या पथकाने कोणालाही न जुमानता नियोजित कारवाई पूर्ण केली.

कारवाईपूर्वी मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत आणि पुष्प देत गांधीगिरीच्या माध्यमातून विरोध करण्यात आला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यापूर्वी महापालिकेने कौसर पार्क येथील घर आणि नारेगाव येथील कार्यालयावर नोटीस चिटकवत मालमत्तेची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. तीन दिवसांची मुदत संपल्यानंतर मतीन पटेल यांनी आणखी १५ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावत पालिकेने २४ तासांची अंतिम नोटीस बजावली होती.

दरम्यान, मतीन मजीद शेख यांच्या नारेगाव येथील बिस्मिल्ला कॉलनीतील घर आणि दुकाने बेकायदा असल्याचा दावा करत महापालिकेने कारवाई सुरू केली होती. या विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली नाही, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची हमी महापालिकेकडून घेण्यात आली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे, ही कारवाई राजकीय दबावातून आणि सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप एमआयएम पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,332 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क