छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राबाहेर लागलेली आग आठ दिवस उलटूनही पूर्णपणे विझलेली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सतत धुमसणाऱ्या या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत असून चार ते पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
मनपा प्रशासन आग विझविण्यात अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कचरा डेपोसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसेना गटनेते गणेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करत घोषणाबाजी करण्यात आली. “कचरा डेपो बंद करा”, “मनपा प्रशासनाचा धिक्कार असो”, “दादागिरी नही चलेगी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पडेगाव येथील कचरा डेपोला ७ मे रोजी आग लागली होती. त्यानंतर दररोज दोन ते तीन अग्निशमन गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचा मारा सुरू असला तरी आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. महापालिकेच्या तीन झोनमधील कचरा या ठिकाणी टाकला जात असून, प्रक्रिया न झालेल्या कचऱ्याचे मोठमोठे ढीग येथे साचले आहेत. बायोमायनिंग प्रक्रिया सुरू असली तरी कचऱ्याचे प्रमाण कमी झालेले नाही.
दरम्यान, मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी कचऱ्यात तयार झालेल्या मिथेन वायूमुळे आणि वाढत्या तापमानामुळे आग भडकत असावी असल्याचे सांगितले. या आंदोलनात नगरसेविका सावित्री वाणी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*