छत्रपती संभाजीनगर : शहराच्या बहुप्रतिक्षित जलयुक्तीकरण प्रकल्पाच्या कामात पुन्हा एकदा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची कोडगावजवळील साडेसाती संपेना, अचानक निखळल्याने जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येऊ लागले. या घटनेमुळे जलवाहिनीच्या चाचणी प्रक्रियेला पुन्हा खीळ बसली असून प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीमार्फत शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलवाहिनीची चाचणी सुरू असताना शनिवारी सकाळी हा तांत्रिक बिघाड निदर्शनास आला. जलवाहिनीतील वेल्डिंग निखळल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात २१ जूनपासून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणून चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, या बिघाडामुळे चाचणीला तात्पुरता अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून रविवारी दुपारनंतर पुन्हा जलवाहिनीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच एमबीआरएसपासून जटवाड्यापर्यंत पाणीपुरवठ्यासाठी विविध जलकुंभांची जोडणीही अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी नक्षत्रवाडी येथील प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. “जलयुक्तीकरण प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासनाने लवकरच दुरुस्ती पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*