छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे रोजी एकदिवसीय बंदची हाक दिली असून, जिल्ह्यातील तब्बल चार हजार औषधी दुकाने आज बंद राहणार आहेत. या बंदमुळे शहर आणि ग्रामीण भागातील औषध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन आणि औषध विक्रेता संघटनांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
औषध विक्रेता संघटनांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात अधिसूचना जारी केली होती. मात्र, त्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने देशभरात बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री वाढत आहे. यामुळे पारंपरिक औषध दुकानदारांवर आर्थिक संकट ओढवले असून, अनेक लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.
दरम्यान, बंद काळात अत्यावश्यक रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रशासनाने जिल्हानिहाय नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. गरजू रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. औषध मिळण्यात अडचण आल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त (औषधे) कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
औरंगाबाद केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी सांगितले की, हा बंद रुग्णांच्या विरोधात नसून औषध व्यवसाय वाचवण्यासाठीचा इशारा आहे. सरकारने ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियम लागू करावेत आणि बेकायदेशीर विक्री थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*