छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवार, उद्या २१ मेपासून सुरुवात होत आहे. प्रवेश अर्ज नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्यानंतर प्रवेश फेरींच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने दिली आहे.
राज्यात यंदा ४१८ शासकीय आणि ५८६ खासगी अशा एकूण १ हजार ४ आयटीआय संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एकूण १ लाख ५७ हजार ६६४ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला वाढती मागणी लक्षात घेता यंदाही विविध तांत्रिक ट्रेडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश दिले जाणार आहेत.
यामध्ये सर्वाधिक २५ हजार १४० जागा इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी उपलब्ध असून त्यापाठोपाठ फिटर ट्रेडसाठी २३ हजार ४२० जागा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वेल्डर ट्रेडसाठी १७ हजार ३४०, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) साठी १० हजार ८२४ तर डिझेल मेकॅनिक ट्रेडसाठी ८ हजार ६४ जागा उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त विविध तांत्रिक क्षेत्रातील एकूण ३१ ट्रेड विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत.
दरम्यान, पुढील वर्षापासून काही नवीन ट्रेड सुरू करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार सोलार आणि ई-व्हेईकल संबंधित ट्रेड काही ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्यालाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मेपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी अर्ज निश्चितीची प्रक्रियादेखील सुरू होईल. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसायिक आणि संस्थानिहाय पर्याय सादर करण्यासाठी १ जूनपासून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश फेरींचे अंतिम वेळापत्रक दहावीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतरच जाहीर होणार आहे.
प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे काळजीपूर्वक भरावीत, असे आवाहन विभागाने केले आहे. राज्यात एक हजारांहून अधिक आयटीआय संस्था कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*