छत्रपती संभाजीनगर : सावंगी परिसरातील केंब्रिज चौकाजवळ मातीच्या गोळ्याखाली चार वर्षांच्या विशेष बालकाचा मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत शहर पोलिसांनी तब्बल ५०० किलोमीटर प्रवास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे हे दोघे बालकाचे खरे आई-वडील नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.

संतोष सोनाजी ढाळे (रा. मोप, ता. रिसोड, जि. वाशीम, सध्या रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) आणि पूजा राजू पाडेवाड (रा. सगरोळी जवळ, ता. बिलोली, जि. नांदेड, सध्या रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी ही माहिती दिली.

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत बालकाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी चिकलठाणा परिसरात चौकशी सुरू केली. तपासादरम्यान बालकाची ओळख पटली, मात्र त्याच्यासोबत राहत असलेले कथित पालक गायब असल्याचे समोर आले.

यानंतर उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाने संशयितांचा शोध घेण्यासाठी वाशिम, रिसोड आणि अकोला परिसरात धाव घेतली. आरोपींकडे मोबाइल नसल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अखेर नातेवाईकांच्या माध्यमातून आरोपींचा ठावठिकाणा मिळाला. देऊळगाव राजा येथे ते असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान संशयितांकडून सातत्याने वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संतोष ढाळे हा पूजा पाडेवाडसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचे सांगतो, तर कधी त्यांनी लग्न केल्याचे सांगितले जाते. पूजा पाडेवाड कधी मृत बालक हे तिच्या बहिणीचे मूल असल्याचे सांगते, तर कधी ते मूल चोरून आणल्याचे कबूल करते. त्यामुळे बालकाचा या दोघांशी नेमका काय संबंध होता, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, चौकशीत संतोष ढाळे याने बालकाचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. विशेष बालक असल्यामुळे तो सतत रडत होता. आरोपी दारूच्या नशेत त्याला वारंवार मारहाण करीत असल्याचेही समोर आले आहे. रागाच्या भरात त्याने बालकाचा गळा दाबून खून केल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलिस करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,431 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क