छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या पळशी गावात मंगळवारी रात्री घडलेल्या एका थरारक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला. गावात चोर शिरल्याची अफवा पसरताच संतप्त ग्रामस्थांनी दोन अनोळखी व्यक्तींना पकडून बेदम मारहाण केली. मात्र काही वेळातच धक्कादायक सत्य समोर आले आणि मारहाण झालेले दोघेही आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील पोलीस कर्मचारी असल्याचे उघड झाले.
माहितीनुसार, आंध्र प्रदेश पोलिसांचे दोन कर्मचारी एका आरोपीच्या शोधासाठी साध्या वेशात पळशी गावात आले होते. आरोपीचा पाठलाग करताना ते एका घरात शिरले. अचानक घरात घुसलेल्या अनोळखी व्यक्तींमुळे घरातील महिला घाबरली आणि आरडाओरड करू लागली. काही क्षणांतच गावभर “चोर आले… चोर आले…” अशी आरडाओरड सुरू झाली.
ग्रामस्थांनी दोघांचा पाठलाग सुरू केला. यातील एकाला रस्त्यावर पकडून जोरदार मारहाण करण्यात आली, तर दुसरा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या घरात घुसला. तेथील महिलांनीही आरडाओरड केल्याने ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला. अखेर दोघांनाही पकडून जमावाने बेदम चोप दिला.
विशेष म्हणजे मारहाणीवेळी दोघेही स्वतःला पोलीस असल्याचे सांगत होते. मात्र संतप्त जमावाने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. चौकशीनंतर संबंधित दोघेही आंध्र प्रदेश पोलिस दलातील कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेत संबंधित महिला बेशुद्ध झाली असून तिलाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमी पोलिसांवरही उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राजेंद्र बनसोडे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*