छत्रपती संभाजीनगर : शहरात गुरुवार, २८ मे रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, यानिमित्त छावणी येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नागरिकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने छावणी, रोजाबाग आणि ईदगाह परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. हे बदल २८ मे रोजी सकाळी ५ वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

वाहतूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईदगाह मैदानाजवळील काही प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच हडको कॉर्नर ते उद्धवराव पाटील चौक या मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात येईल. या मार्गावरील वाहने शासकीय रुग्णालयाच्या दिशेने सुरू असलेल्या दुसऱ्या मार्गाचा वापर करून ये-जा करतील. पोलिस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

घाटी रुग्णालय व पाणचक्की मार्गे मिलिंद चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. ही वाहने घाटी रुग्णालय, ज्युबिली पार्क, मिलकॉर्नर, बारापुल्ला गेट मार्गे मिलिंद चौकाकडे वळवण्यात येतील. तसेच मिलिंद चौक, बारापुल्ला गेट, मिलकॉर्नर, ज्युबिली पार्क, टाऊन हॉल आणि मकाई गेट या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, बकरी ईद शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी ४ उपायुक्त, ७ सहायक आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, ५८ एपीआय व पीएसआय, ९८६ अंमलदार, ४९ महिला अंमलदार, ७ कॅमेरामन, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी तसेच ४०० पुरुष व १०० महिला होमगार्ड असे एकूण १६३६ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी शहरात ३ विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, ६ ठिकाणी २४ तास तपासणी नाके सुरू ठेवण्यात येणार आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

640 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क