छत्रपती संभाजीनगर : शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्रावर पतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विष्णू बिभिषण आवाड (वय २७, रा. इंदापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सिडको पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू आवाड आणि आरती (नाव बदललेले) यांची ओळख फलटण येथील पोलीस भरती अकॅडमीत झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. सध्या दोघेही विवाहित आहेत. आरती तिच्या पतीसोबत टीव्ही सेंटर परिसरात राहत असून विष्णू हा आपल्या पत्नी व मुलासह मूळ गावी राहतो. तो पोलीस भरतीच्या तयारीसाठी सातारा येथे बहिणीकडे राहत होता. विष्णू अधूनमधून आरतीला भेटण्यासाठी संभाजीनगरात येत असल्याचे समोर आले आहे.

२ जून रोजी विष्णू पुन्हा आरतीला भेटण्यासाठी आला होता. ही बाब समजल्यानंतर आरती आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला. त्यानंतर आरती, तिचा पती आणि विष्णू हे तिघे स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये चर्चा करण्यासाठी गेले. तेथे विष्णू आणि आरतीच्या पतीमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या पतीने तेथून निघून जाऊन घरातून चाकू आणला. काही वेळाने तो पुन्हा गार्डनमध्ये आला आणि पाठीमागून येत विष्णूच्या गळ्यावर चाकूने वार केला.

विष्णूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने जवळील मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. त्यामुळे विष्णू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला. आरतीने तातडीने विष्णूला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. विष्णूवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जखमी विष्णू रुग्णालयात दाखल असल्याचे समजल्यानंतर आरोपी हॉस्पिटल परिसरातही आला होता. याची माहिती मिळताच आरतीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना कळविले. पोलिसांनी दोघांना सिडको ठाण्यात आणले असता आरोपीने स्वतःच हल्ल्याची कबुली दिली. या प्रकरणी विष्णूचा भाऊ श्रीकृष्ण आवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,640 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क