छत्रपती संभाजीनगर :  अन्न व औषध प्रशासन (FDA) छत्रपती संभाजीनगर विभागाने अन्न सुरक्षा व गुणवत्ता तपासणी मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि. ४ जून) एमआयडीसी चिखलठाणा परिसरात मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या आईस्क्रीमचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अन्न सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

FDA च्या पथकाने एमआयडीसी चिखलठाणा येथील एम/एस राज महल आईस्क्रीम या गोडाऊनची तपासणी केली. गोडाऊनमध्ये साठवण्यात आलेल्या आईस्क्रीमच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध प्रकारचे आईस्क्रीम जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या साठ्यात ‘शाही गुलाब’ फ्लेवरचे ९८.८ किलो आईस्क्रीम असून त्याची किंमत २२ हजार ७२४ रुपये आहे. तसेच ‘मँगो’ फ्लेवरचे ८८.८ किलो आईस्क्रीम जप्त करण्यात आले असून त्याची किंमत २० हजार ४२४ रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १८७.६ किलो आईस्क्रीम जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत ४३ हजार १४८ रुपये इतकी आहे.

या प्रकरणात नरेशकुमार मदनलाल जाट (वय ३५) यांचे नाव समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या आईस्क्रीमबाबत भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून अन्न सुरक्षा नियमांनुसार तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त एस. आर. करकाळे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. जप्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती FDA प्रशासनाने दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,423 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क