छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नवीन पाठ्यपुस्तके पोहोचावीत, या उद्देशाने महापालिकेने यंदा पाठ्यपुस्तक वितरणाचे काटेकोर नियोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील १ लाख ४० हजार २९९ विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी शनिवारी सेंट झेवियर्स स्कूल येथील पाठ्यपुस्तक साठवणूक व वितरण केंद्राला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वितरण प्रक्रियेची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना सर्व शाळांमध्ये वेळेत पाठ्यपुस्तके पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. साठवणूक केंद्रातील सुरक्षितता, व्यवस्थापन आणि वितरणाची तयारी पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ इयत्ता पहिली ते आठवीतील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी महापालिकेने फेब्रुवारी महिन्यातच पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवून दूरदृष्टी दाखविली होती. त्यानुसार शहरातील ५१३ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एकूण ८ लाख ३९ हजार ५२ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती.

पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्राकडून आतापर्यंत ६ लाख ६० हजार १० पुस्तके प्राप्त झाली असून, हे प्रमाण सुमारे ७९ टक्के आहे. उर्वरित पुस्तकांचा पुरवठा लवकरच पूर्ण होणार असून ८ ते १२ जून दरम्यान केंद्रनिहाय सर्व शाळांना पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. यावर्षी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आले असून सुधारित आवृत्त्यांचा साठाही महापालिकेकडे उपलब्ध झाला आहे.

शहरात सध्या ३४४ मराठी, १५८ उर्दू, ५ हिंदी आणि ६ इंग्रजी माध्यमांच्या अशा एकूण ५१३ शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळांपर्यंत पुस्तके वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, प्रशासन अधिकारी संजीव सोनार, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय कोल्हे व रईसा खान बेगम आदी अधिकारी परिश्रम घेत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

487 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क