छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत झालेले तिन्ही विद्यार्थी अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होते.

यश ज्ञानेश्वर बारबैले (वय १६, रा. लक्ष्मी कॉलनी), आदर्श गौतम इंगोले (वय १५, रा. बाराघर) आणि विशाल मच्छिंद्र घुले (वय १५, रा. बाराघर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. अग्निशमन दल, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. यावेळी दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सहा मित्र पोहण्यासाठी साई टेकडीजवळील तलावावर गेले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी त्यांनी पोहण्याचा बेत आखला होता. तलावातील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने एक मुलगा अचानक बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे दोन मित्र तत्काळ पुढे सरसावले. मात्र पाणी अधिक खोल असल्याने ते दोघेही पाण्यात ओढले गेले आणि तिघांचाही बुडून मृत्यू झाला. उपस्थित नागरिकांनी आणि बचाव पथकाने उर्वरित दोन मुलांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.

या दुर्घटनेतील यश बारबैले हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. विशेष म्हणजे त्याची आई गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती आणि शनिवारीच ती बरी होऊन घरी परतली होती. मात्र त्याच दिवशी मुलाच्या मृत्यूची बातमी कुटुंबावर कोसळली. आदर्श इंगोले याचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न होते. त्याच दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी मोठ्या आशेने अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. तर विशाल घुले हा शिक्षणासोबत मंडप बांधणीचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता.

या दुर्दैवी घटनेमुळे सातारा परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांनी तलाव आणि खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

980 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क