छत्रपती संभाजीनगर : घरातून पळून गेलेल्या प्रत्येक मुलामागे एका आईची तगमग, वडिलांची असहायता आणि संपूर्ण कुटुंबाची वेदना दडलेली असते. अशाच अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलविण्याचे काम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेअंतर्गत केले आहे. या मोहिमेद्वारे विविध कारणांमुळे घर सोडून गेलेल्या १७ बालकांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

राज्यात ८ ते २३ जून या कालावधीत हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन शोध-४’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी केवळ हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यावर भर न देता तुटलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

मोहिमेदरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडियावरील हालचाली, रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि गर्दीची ठिकाणे यांची कसून तपासणी केली. तसेच विविध जिल्ह्यांतील पोलिसांशी सातत्याने समन्वय साधून प्रत्येक धाग्याचा बारकाईने तपास करण्यात आला. या अथक प्रयत्नांनंतर सर्व १७ बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

शोधण्यात आलेल्या १७ बालकांपैकी तब्बल ११ मुली प्रेमप्रकरणातील भूलथापांना बळी पडून घरातून निघून गेल्या होत्या. दोन मुलींनी रागाच्या भरात घर सोडले होते, तर एका मुलाने आई-वडिलांमधील सततच्या वादाला कंटाळून घर सोडल्याचे समोर आले. तसेच इंस्टाग्रामवरील आभासी आणि उच्चभ्रू जीवनशैलीच्या आकर्षणामुळे एक १७ वर्षीय मुलगी पुण्याकडे निघून गेली होती. अभ्यासाच्या तणावामुळे एका मुलीने घर सोडले, तर मुंबई पाहण्याच्या उत्सुकतेपोटी तीन मित्र घराबाहेर पडल्याचे तपासात उघड झाले.

ग्रामीण पोलिसांच्या या संवेदनशील आणि प्रभावी कारवाईमुळे १७ कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा आनंद परतला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,051 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क