छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातही आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबासह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा येथील वंदना अंभोरे या कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात आल्या होत्या. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या आपल्या कुटुंबीयांसह सिद्धार्थ उद्यानात फिरण्यासाठी गेल्या होत्या. सुटीचा दिवस असल्याने उद्यानात नागरिकांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी वंदना अंभोरे, मनीषा वाघमारे यांच्यासह एकूण तिघी महिलांना लक्ष्य केले.
चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, पर्समधील रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. चोरीच्या घटनेत पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, प्रत्येकी एक ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या वाट्या, तीन हजार रुपयांची रोख रक्कम आणि आवश्यक कागदपत्रे असलेली पर्स असा ऐवज लंपास करण्यात आला. घरी परतल्यानंतर संबंधित महिलांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान, शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुटण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र आता चोरट्यांनी सिद्धार्थ उद्यानासारख्या कुटुंबीयांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणालाही लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्यानात सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त असतानाही चोरट्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*