छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायावर मोठी कारवाई करत गंगापूर तालुक्यातील एका वॉटर प्लांटवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान तब्बल 10 लाख 1 हजार 600 रुपयांचा पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित प्लांट आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असल्याचे तसेच ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकाने प्लांटची तपासणी केली असता, व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या विविध वैधानिक परवानग्या घेण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले. तसेच पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची विक्री नियमांचे पालन न करता सुरू असल्याचेही आढळले.
या कारवाईत ओमरिच, यशरिच आणि हायड्राशुअर या ब्रँडच्या पिण्याच्या पाण्याचे एकूण पाच नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, संबंधित उद्योगाला अन्न व औषध प्रशासनाकडून ‘स्टॉप बिझनेस नोटीस’ बजावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली.सहाय्यक आयुक्त विवेक पाटील आणि सहआयुक्त एस. आर. कारकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सौ. पी. पी. सुरसे, एस. ए. केदार आणि वाय. डी. चिभडे यांनी ही कारवाई केली. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*