पैठण : तालुक्यातील चौंढाळा येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन लहान बालके गंभीर जखमी झाली आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहामांडवा-डोणगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला. चौंढाळा येथील चव्हाण कुटुंबातील सदस्य दुचाकीवरून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, पाचोड येथील आठवडे बाजारातून चिंचाळ्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील सर्वजण गंभीर जखमी झाले.

या अपघातात सिद्धार्थ चव्हाण, पायल चव्हाण आणि आव्हान्या चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या संजना चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे.

अपघातात जखमी झालेली दोन लहान बालके गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष उपचार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच पाचोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

565 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क