छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवत एका रात्रीत तब्बल २ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत एकूण ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मा. प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मा. प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली २० जून रोजी सायंकाळी ६ ते २१ जून रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात आली.
या मोहिमेत अवैध वाळू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ११ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत १ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याशिवाय, यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या ६० वाहनांसह १२ चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात आला आहे.
गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात ९ गुन्हे दाखल करून ९ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच १,११० लिटर दारू, रसायने व साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या ३१ आरोपींविरोधात ३१ गुन्हे दाखल करून ६८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
जुगार अड्ड्यांवर छापे टाकत २० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ८२ हजार ९६० रुपयांची रोख रक्कम आणि १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. शस्त्र कायद्यांतर्गत २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे आणि एक तलवार जप्त करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा वाहतुकीप्रकरणी ६ गुन्हे दाखल करून १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोवंश तस्करीविरोधातही कारवाई करत २४ जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. भविष्यातही नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*