छत्रपती संभाजीनगर : बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी तसेच महिला बचतगटांना विविध व्यवसायांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेची ७ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शैलेश बाबूराव कांबळे (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, गादिया विहार) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविता गणेश पाथरे (वय ४१, रा. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्या सुसंकल्प महिला मंडळ आणि सुसंकल्प निधी अर्बन लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ मध्ये पाथरे यांची ओळख शैलेश कांबळे याच्याशी झाली होती. त्यावेळी कांबळे याने बर्फाचा कारखाना उभारण्यासाठी आणि महिला बचतगटांना विविध व्यवसायांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते.
कर्ज प्रक्रियेसाठी विविध खर्च येणार असल्याचे सांगत, “तुम्ही फक्त आर्थिक रसद पुरवा, मी शंभर टक्के कर्ज मिळवून देतो,” असे सांगून त्याने वेळोवेळी फिर्यादींकडून रोख रक्कम आणि ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण ७ लाख ३५ हजार रुपये घेतले. एवढेच नव्हे, तर यापूर्वी ५०० ते ७०० जणांना एक कोटी ते २५ कोटी रुपयांपर्यंतची कर्जे मिळवून दिल्याची थापही त्याने मारली होती.
मात्र, पैसे घेऊनही कर्ज मंजूर झाले नाही. याबाबत विचारणा केल्यावर आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पुढील चौकशीत आरोपीने सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) कार्यालयात फिर्यादींच्या नावाने चुकीचा पत्ता आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून बनावट पत्रव्यवहार केल्याचे समोर आले. तसेच, पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने दिलेले पंजाब नॅशनल बँकेचे प्रत्येकी एक लाख रुपयांचे तीन धनादेश खाते बंद असल्याने बाऊन्स झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाथरे यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*