छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून तब्बल १८ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शहरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत होते. त्यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करणारा गजानन फकीरा जाधव (वय २६) हा आपल्या साथीदार सचिन भुजंगराव मिसाळ याच्यासह चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी बुलढाणा जिल्ह्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल, बेगमपुरा, सिडको, मुकुंदवाडी, एमआयडीसी व इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांच्या एकूण १८ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. यामध्ये एचएफ डिलक्स, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, होंडा ड्रीम युगा आदी दुचाकींचा समावेश आहे.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलिस कर्मचारी प्रकाश गायकवाड, अमोल शिंदे, अशरफ सय्यद, योगेश नवसारे, प्रदीप दंडवते, राजेश यदमळे आदींच्या पथकाने केली.
दरम्यान, नागरिकांनी जुनी दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करताना वाहनाची सर्व कागदपत्रे तपासूनच खरेदी करावी, तसेच संशयास्पद वाहनांबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*