छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात छत्रपती संभाजीनगरमधील चार व्यावसायिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मंदसौर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आणि जखमी सर्वजण कारने दिल्लीला मोबाईल उपकरणे व दुरुस्तीसाठी लागणारे आधुनिक साहित्य खरेदी करण्यासाठी निघाले होते. ते जळगावमार्गे दिल्लीकडे जात असताना दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील सीतामऊ परिसरातील तितरोदजवळ त्यांच्या कारची ट्रक ट्रेलरला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला.
अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीची मदत पोहोचू शकली नसल्याने बचावकार्याला विलंब झाला. दरम्यान, परिसरातील ग्रामस्थ आणि इतर वाहन चालकांनी पुढाकार घेत सुमारे एक तास अथक प्रयत्न करून जखमी व मृतांना वाहनाबाहेर काढले. त्यानंतर त्यांना खासगी वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातात राजेंद्र भाऊराव कवडे (४६), सचिन गंगाधर गजभारे (३९), संदीप नवनाथ बोरसे (३४) आणि रवींद्र भागवत काळे (२८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अब्दुल खलील (३०) आणि उमर इस्माईल जागीरदार (३२, रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत राजेंद्र कवडे यांनी शहरातील कॅनॉट प्लेस परिसरात मोबाईल साहित्याचे दुकान सुरू केले होते. दुकानासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी ते सहकाऱ्यांसह दिल्लीला जात होते. या अपघातात कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*