छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 58 हजार 967 वीजग्राहकांनी घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारले असून, त्यांची एकूण स्थापित क्षमता 206 मेगावॅट झाली आहे. यातील 52 हजार 763 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तब्बल 410 कोटी 33 लाख रुपयांचे अनुदान थेट जमा करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 47 हजार 530 ग्राहकांनी 166.12 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. यापैकी 42 हजार 619 ग्राहकांना 331.31 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. तर जालना जिल्ह्यात 11 हजार 437 ग्राहकांनी 39.88 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले असून, 10 हजार 144 ग्राहकांना 79.02 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
दोन किलोवॅटसाठी 60 हजार, तर तीन किलोवॅटसाठी 78 हजारांपर्यंत अनुदान
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एका किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्मिती होते. त्यामुळे घरगुती वीजबिल मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देऊन ग्राहकांना आर्थिक लाभ मिळू शकतो.
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, फेसलेस आणि पेपरलेस
या योजनेअंतर्गत महावितरणकडून सोलर नेट मीटर विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहेत. मोबाईलवरून वीजनिर्मिती, वीजवापर आणि अतिरिक्त वीज युनिटची माहिती मिळत असल्याने ग्राहकांना वीज वापराचे नियोजन करणे सोपे झाले आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, फेसलेस आणि पेपरलेस पद्धतीने होत असल्याने कार्यालयीन फेऱ्यांची गरजही कमी झाली आहे.
महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ही योजना ग्राहकांना वीजबिलात बचत करून देण्यासोबतच स्वच्छ ऊर्जेला चालना देणारी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*