छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील एका प्री-स्कूलमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याला दुसऱ्या बालकाने मारहाण करून चावे घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करत पालकांनी तक्रार दाखल केली असून, प्राचार्यासह विविध पदाधिकाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात २३ महिन्यांच्या बालकाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे व्यवसायाने वकील असून, २२ जून रोजी त्यांनी आपल्या मुलाला नेहमीप्रमाणे शाळेत सोडले होते. दुपारी मुलाला घेण्यासाठी जाण्यापूर्वी शाळेच्या प्राचार्यांनी फोन करून मुलाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती दिली. मात्र, शाळेत पोहोचल्यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर तसेच शरीराच्या विविध भागांवर जखमा आणि चाव्यांच्या खुणा दिसून आल्या.

यानंतर पालकांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. सुरुवातीला शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर मिळालेल्या फुटेजमध्ये वर्गातील मदतनीस एका मुलाला बाहेर घेऊन गेल्यानंतर वर्गाचा दरवाजा बंद करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर वर्गात उपस्थित असलेल्या एका बालकाने पीडित चिमुकल्याला तब्बल १५ मिनिटे मारहाण करून विविध ठिकाणी चावे घेतल्याचे समोर आले. या काळात वर्गात कोणताही शिक्षक किंवा जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याचा दावा पालकांनी केला आहे.

घटनेनंतर जखमी बालकावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच, शाळा प्रशासनाने तक्रार करू नये, अशी विनंती करत पैशांची ऑफर दिल्याचा आणि धमकी दिल्याचाही आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,002 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क